चालू घडामोडी : १६ मे २०२०

एमएच-६० आर सी-हॉक हेलिकॉप्टर

भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकी बनावटीचे एमएच-६० आर सी-हॉक हेलिकॉप्टर दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीच्या ९०५ लाख डॉलरच्या करारलभ मंजूरी देण्यात आली आहे. करारानुसार अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टिन भारताला २१ हेलिकॉप्टर देणार आहे. 

या हेलिकॉप्टरचा पहिला ताफा सप्टेंबर २०२४ पर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे. यात तीन एमएच-६० आर सी हॉक हेलिकॉप्टर भारतीय नौदलास तर एक २१ एमएच-६० आर भारत सरकारला देण्यात येणार आहे.

एमएच-६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टरमध्ये पाणबुडी भेदी क्षेपणास्त्रे सोडण्याची क्षमता आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर  वेगवान हालचालीसाठी प्रसिद्ध आहे. त्यावरून ॲंटी सबमरीन मार्क ५४ टोरपॅडो सोडता येऊ शकतील.

पंचेन लामा

तिबेटमधील 11 वे धर्मगुरु पंचेन लामा यांची सुटका करावी, अशी विनंती अमेरिकेकडून चीनला करण्यात आली आहे.

14 मे 1995 मध्ये  नोबेल शांती पुरस्कार विजेते तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांनी सहा  वर्षीय गेधुन चोएक्यी नीमा यांना पंचेन लामा यांचा अवतार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तीन दिवसांनी या बालकाला ताब्यात घेण्यात आले होते. 

 मानवाधिकार समुहाने या प्रकरणाला जगातील सर्वात कमी वयाचा राजकीय कैदी असे या प्रकरणातील पंचन लामा यांचे वर्णन केले होते.  

तिबेटमधील दलाई लामा यांच्यानंतर पंचेन लामा बौद्ध धर्मातील दुसऱ्या स्थानावरिल आध्यात्मिक पद आहे. 

कोण आहेत पंचेम लामा?

14 मे 1995 मध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गेधुन चोएक्यी नीमा यांना 11 वे धर्मगुरु म्हणून घोषीत केले. 17 मे 1995 मध्ये 6 वर्षीय गेधुन चोएक्यी नीमा  कुटुंबियांसह रहस्यमयरित्या गायब झाले. 28 मे 1996 पर्यंत या अपहरणामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा मुद्दा उचलल्यानंतर चीनने पंचम लामा यांना कैद केल्याचे समोर आले होते. दलाई लामा यांनी पंचेम लामा यांना धर्मगुरु घोषीत केल्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आमाल्हाला लष्कराला पाठवावे लागले, असे चीनने म्हटले होते. दरम्यान 29 नोव्हेंबर 1995 मध्ये चीनने ग्लालसन नोरबू यांना पंचेन लामा घोषीत केले होते.  

भारतीय तटरक्षक दलाचे जहाज संरक्षणमंत्र्यांकडून कार्यान्वित

भारतीय तटरक्षक दलाचे एक जहाज व दोन छेदक बोटी (इंटरसेप्टर बोटस्) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून कार्यान्वित केल्या. गोव्यातील तटरक्षक दलाचे हे जहाज व बोटी असून त्यामुळे सागरी सुरक्षा वाढणार आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे ‘सचेत’हे टेहळणी जहाज असून सी ४५० व सी ४५१ या छेदक बोटी आहेत. त्यांचे कार्यान्वयन एका व्हीडीओ दुव्याच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांनी केले. 

तटरक्षक दलाचे जहाज डिजिटल माध्यमातून कार्यान्वित करण्याची ही पहिलीच वेळ होती. 

आयसीजीएस सचेत हे पाच समुद्र गस्त जहाजांच्या (ओपीव्ही) शृंखलेतील पहिले जहाज आहे. ते गोवा शिपयार्डने  (जीएसएल)  संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि निर्मित केले असून  अत्याधुनिक आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहे.  

105 मीटर लांबीचे ‘सचेत’ जहाज अंदाजे 2,350 टन विस्थापन क्षमतेचे असून  याला 6000 नौटिकल मैल क्षमतेसह 26 समुद्री मैलाची कमाल गती प्राप्त करण्यासाठी डिझाईन केलेली दोन 9100 केडब्ल्यू डीझेल इंजिने बसविण्यात आली आहेत. अत्याधुनिक उपकरणे आणि प्रणालींसह एकवटलेली प्रवेशयोग्यता, तिला कमांड प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडण्याची क्षमता आणि आयसीजी सनद पूर्ण करण्याची कार्यक्षमता प्रदान करते. हे जहाज दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टर आणि चार वेगवान नौका आणि स्विफ्ट बोर्डिंग आणि शोध आणि बचाव कार्यासाठी एक इंफ्लेटेबल बोट वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे जहाज समुद्रातील तेल गळतीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काही प्रदूषण प्रतिसाद उपकरणे नेण्यास सक्षम आहे.

आयबीएस सी-450 आणि सी-451 या नौका स्वदेशी  डिझाईनने निर्मित आणि लार्सन व टुब्रो शिपयार्ड हजीरा यांनी निर्माण केलेले अद्ययावत नेव्हिगेशन आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहेत. 30 मीटर लांबीच्या या दोन नौका 45 नॉट्सपेक्षा जास्त वेग मिळविण्यास सक्षम आहेत आणि वेगवान हस्तक्षेप, जवळच्या किनाऱ्यांवर गस्त घालणे आणि कमी जोखमीच्या सागरी कार्यवाहीसाठी डिझाइन केलेल्या आहेत.

ई-नाम पोर्टलशी 38 नव्या मंडया जोडल्या

भारतभरातील 38 कृषी उत्पन्न  बाजारपेठा  ई-नाम पोर्टलशी आज जोडल्या गेल्या असून त्यायोगे एकूण 415 कृषीउत्पन्न बाजारपेठा जोडल्या जाण्याचा नियोजित टप्पा गाठला गेला आहे.  यात मध्यप्रदेश(19),तेलंगणा(10), महाराष्ट्र (4),याबरोबर गुजरात,हरयाणा,पंजाब,केरळ आणि जम्मू काश्मिरमधील प्रत्येकी (1) अशा एकूण 38 बाजारपेठांचा समावेश आहे .

पहिल्या टप्प्यात 585 आणि आता दुसऱ्या टप्प्यात नव्या 415 मंडया जोडल्या गेल्याने आता 18 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश मिळून आता एकूण 1000 बाजारपेठांचा या पोर्टलमध्ये समावेश झाला आहे .

नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट (e-NAM ) इलेक्ट्रॉनिक पोर्टलचे उद्‌घाटन 14 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते ,वन नेशन वन  मार्केट  असा कृषीमालाच्या विक्री साठी   संपूर्ण देशभरात एकच  सामायिक मंच  असावा या उद्देशाने याची स्थापना झाली होती.

संरक्षण उपकरण चाचण्यांसाठी 400 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा स्थापना योजनेला मान्यता

देशांतर्गत संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाला चालना मिळावी म्हणून या क्षेत्रासाठी अत्याधुनिक चाचणी विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 400 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा योजनेला (डीटीआयएस) मंजुरी दिली आहे. ही योजना पाच वर्षांच्या कालावधीसाठी चालविली जाईल आणि खाजगी उद्योगांच्या भागीदारीतून सहा ते आठ नवीन चांचणी सुविधा सुरू करण्याची योजना आखली जाईल. 

या योजनेंतर्गत प्रकल्पांना ‘अनुदान-मदत’ या स्वरूपात 75 टक्के पर्यंत शासकीय निधी पुरविला जाईल. प्रकल्प खर्चाच्या उर्वरित 25 टक्के खर्च विशेष प्रयोजन व्यवस्थेद्वारे (एसपीव्ही) करावा लागेल, ज्यात भारतीय खाजगी संस्था आणि राज्य सरकारे सहभागी असतील.

अमेरिकेमध्ये १८ मुद्यांची योजना 

कोरोनासंदर्भात ‘खोटेपणा, दिशाभूल आणि लपवाछपवी’ करत जगभर संसर्ग पसरविल्याबद्दल चीन सरकारला जबाबदार ठरविण्यासाठी अमेरिकेमध्ये १८ मुद्यांची योजना तयार करण्यात आली आहे. अमेरिकचे वरीष्ठ सिनेटर थॉम टिलीस यांनी हा मसुदा तयार केला आहे.

योजनेतील प्रमुख मुद्दे…

 • प्रशांत महासागरात संरक्षण यंत्रणा निर्माण करणे
 • अमेरिकी लष्कराला तातडीने २० अब्ज डॉलरचा निधी देणे
 • भारत, तैवान आणि व्हिएतनामबरोबर लष्करी संबंध अधिक दृढ करणे
 • लष्कर उभारणीसाठी जपानला प्रोत्साहन देणे
 • जपान आणि दक्षिण कोरियाला लष्करी साहित्य पुरविणे
 • चीनमधील अमेरिकी उत्पादन कंपन्यांना माघारी बोलाविणे
 • चीनवरील अवलंबित्व कमी करणे
 • अमेरिकी तंत्रज्ञान चोरी करण्यापासून चीनला रोखणे
 • सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे
 • चिनी कंपन्यांवर निर्बंध आणणे
 • चीन सरकारवर निर्बंध आणणे

WTO च्या महासंचालकांचा राजीनामा 

जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीत १४ मे रोजी आपला राजीनामा दिला.

अझेवेडो हे संघटनेच्या जिनिव्हा येथील मंडळाचे महासंचालक आहेत. ते २०१३ पासून या पदावर कार्यरत होते. ते दुसऱ्यांदा पदावर काम करत होते. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार होता.

* अम्फान (Amphan) चक्रीवादळ   : पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

* जागतिक बँकेनं देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी १ अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे.

* अनुसूचित जाती-जमातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा नव्हती. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते ३०० पैकी पहिल्या १०० विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व १०१ ते ३०० पर्यंत ६ लाख रुपये ईतकी उत्पन्न मर्यादा होती. परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती – जमातीच्या १ ते १०० क्रमवारी असलेल्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक उत्पन्नाच्या अटीशिवाय लाभ देण्यात येत होता.

* लॉकडाउनमुळे गेले दिड महिना दिल्लीतच अडकलेल्या आणि मोठ्या अडचणी सहन करणाऱ्या १४०० पेक्षा जास्त मराठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कोरोना काळातील देशातील पहिली विद्यार्थी स्पेशल रेल्वेगाडी दिल्लीहून १६ मे रोजी सुटणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *