जर्मनीतील अर्थमंत्र्याने केली आत्महत्या
जर्मनीमधील हेस्सी प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी नैराश्येमुळे आत्महत्या केली आहे. करोनामुळे जर्मनीच्या आणि प्रांताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने चिंतेत असणाऱ्या शेफर यांनी नैराश्येच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती हेस्सीचे प्रमुख व्होकर बौफियर यांनी दिली आहे. थॉमस हे मागील दहा वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल ज्या सीडीयू पक्षाच्या आहेत थॉमस त्याच पक्षाचे नेते होते. (संदर्भ – लोकसत्ता)
करोनावरील संभाव्य लशीचे घटक शोधण्यात यश
करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी औषध व लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून हैदराबाद विद्यापीठातील महिला संशोधिकेने या विषाणूवर परिणामकारक ठरू शकेल अशी प्रायोगिक लशीचे संभाव्य घटक शोधून काढले आहेत. या लशीवर अजून प्रयोग सुरू व्हायचे आहेत. सार्स व एमईआरएस (सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम व मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या रोगांवरही ही लस परिणामकारक ठरू शकते. हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसच्या जैवरसायन विभागात काम करणाऱ्या डॉ. सीमा मिश्रा यांनी नवीन लशीचे प्रारूप तयार केले आहे. त्यांनी ‘टी सेल एपिटोप्स’ ही प्रायोगिक लस तयार केली असून त्या लशीच्या मदतीने कोविड १९ म्हणजेच करोना विषाणूला मारणे शक्य होणार आहे. (संदर्भ – लोकसत्ता)
संशोधनात काय?
डॉ. मिश्रा यांच्या मते या लशीवर अजून निर्णायक पुरावे मिळण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. लशीचे हे घटक म्हणजे पेप्टाइड असून त्यांच्या मदतीने करोना विषाणूला प्रतिकार केला जात असतो. त्यांच्या मदतीने प्रतिकारशक्ती प्रणालीला संदेश जात असतात. ‘प्रतिकारशक्ती माहितीशास्त्रा’चा आधार घेत संगणनात्मक आज्ञावलीचा आधार घेतला तर लस कमी काळात शोधून काढणे शक्य आहे. विषाणूला प्रतिकार करणाऱ्या एपिटोप्सचा शोध घेण्यात आला असून त्याचा वापर लस तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे एपिटोप्स म्हणजे विषाणूला विरोध करणारे प्रतिपिंड असतात. लस तयार करण्यासाटी खरेतर १०-१५ वर्षे लागू शकतात पण संगणनात्मक मार्गाचा वापर केला तर १० दिवसातही प्रायोगिक लस तयार करता येते. डॉ. सीमा वर्मा यांनी करोना विषाणूला मारणारे संभाव्य घटक शोधून काढले असून त्याआधारे लस तयार करता येईल. मानवी प्रथिनांची हानी न करता विषाणूच्या प्रथिनांचा बिमोड करणारी लस एपिटोप्सच्या मदतीने तयार करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारची हेल्पलाइन
करोना संक्रमणाला प्रतिबंध करणारी उपाययोजना म्हणून २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. सामाजिक अंतर, घरातच अडकून पडावे लागल्यामुळे मात्र, अनेक व्यक्तींना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने अशा व्यक्तींसाठी ०८०४६११०००७ या टोल-फ्री क्रमांकावर हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे. बेंगळूरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थच्या वतीने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (संदर्भ – मटा)
स्पेनच्या राजकुमारीचा कोरोनामुळे मृत्यू
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. अशातच स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. करोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. मारिया स्पेनचे राजा फेलिपे सहावे यांची बहिण होत्या. राजकुमारी मारिया यांचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निधन झाले. २८ जुलै १९३३ रोजी जन्मलेल्या राजकुमारी मारिया यांनी त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये घेतले होते. त्यानंतर त्या पॅरिस येथील विद्यापिठात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या.