देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू
लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. १२५ विरूद्ध १०५ च्या फरकाने राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला असून केंद्र सरकारनं याची अधिसूचना जारी केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यात नेमकं काय?
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आगे.
कोणाला फायदा नाही ?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.
देशातील कोणत्या भागाला असणार नाही हे लागू?
ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
कोणत्या अटींमध्ये करण्यात आलेत बदल?
सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती पाच वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.
‘रेलनीर’प्रमाणे एसटीचे ‘नाथजल’
रेल्वे स्थानकांत मिळणाऱ्या ‘रेलनीर’प्रमाणे आता लवकरच एसटी बस स्थानकांत ‘नाथजल’नावाने बाटलीबंद पाणी मिळणार आहे. महामंडळाने महसूलवाढीसाठी स्वत:चा ‘ब्रँड’ असलेल्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘नाथजल’ नाव का?
तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या काळात एसटीचा ‘ब्रँड’ असलेल्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याची संकल्पना पुढे आली होती. वारकरी संप्रदायात नाथ ही एक उपाधी आणि सन्मानाने घेतले जाणारे नाव आहे. त्यामुळेच ‘नाथजल’ हे नाव सुचवले होते.
‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धा 2020
देशात क्रीडासंस्कृती निर्माण करणे, तळागाळातील गुणवत्ता शोधून काढणे तसेच युवा पिढीमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व वाढवणे, या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला गुवाहाटीत 10 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी यजमानपद भूषवणाऱ्या महाराष्ट्राने तब्बल २२८ पदकांची कमाई करत पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले होते.
१० ते २२ जानेवारीपर्यंत १७ आणि २१ वर्षांखालील वयोगटांत रंगणाऱ्या या स्पर्धेत ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल ६८०० पेक्षा जास्त खेळाडू २० खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील. महाराष्ट्रानेही २० पैकी १९ प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल ७५१ खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास ही उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक असली तरी आपल्या घरच्या मैदानावर ती स्पर्धेत सहभागी होणार नाही.
२०१८ मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र. राज्य सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१ हरियाणा ३८ २६ ३८ १०२
२ महाराष्ट्र ३६ ३२ ४३ १११
३ दिल्ली २५ २९ ४० ९४
२०१९ मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र. राज्य सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१ महाराष्ट्र ८५ ६२ ८१ २२८
२ हरियाणा ६२ ५६ ६० १७८
३ दिल्ली ४८ ३७ ५१ १३६
राष्ट्रीय युवा महोत्सव
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने लखनऊ येथे 12 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान 23 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी 12 जानेवारीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरण रिजीजू यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. युवकांना विविध उपक्रमातील त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधी देण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. ‘तंदुरुस्त युवक, तंदुरुस्त भारत’ अशी या महोत्सवाची संकल्पना आहे.
महत्त्वाचे वनलायनर
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे सुरेश भट सभागृह आयोजित त्रिदिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी व्यान्काया नायडू यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
- 11 जानेवारी रोजी पंतप्रधान कोलकाता येथील चार पुनर्विकसित वारसा इमारतींचे लोकार्पण करणार आहेत. ओल्ड करन्सी बिल्डींग, बेल्वेडेर हाऊस, मेट काल्फ हाऊस आणि व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल या त्या चार इमारती आहेत. या चार प्रसिद्ध गॅलरींचा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुनर्विकास करुन त्यांचे नवीन प्रदर्शनात रुपांतर केले आहे.
- पंतप्रधान 11 आणि 12 जानेवारी रोजी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
- नेताजी सुभाष सुकी गोदी येथे कोचीन कोलकाता जहाज दुरुस्ती कारखान्याच्या सुधारित जहाज दुरुस्ती सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.