मूळ खडकाचे अपक्षय (विदारण) होते. त्यामध्ये सेंद्रिय द्रव्ये मिसळली जातात. मृदांच्या कणांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू भरलेला असतो आणि काही प्रमाणात पाण्याचाही अंश असतो. अशा संयुक्त घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थाला ‘मृदा’ असे म्हणतात.
१. गाळाची मृदा :
→ भारतीय उपखंडाच्या खंडांतर्गत भागात नद्यांनी वाहून आणलेला गाळ व सागर किनारपट्टीवर सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा तयार झाली आहे.
→ प्रामुख्याने सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते.
→ उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.
→ उत्तरेकडील मदानी प्रदेशात गाळाच्या संचयन काळानुसार त्याचे दोन उपप्रकार आहेत : जुनी गाळाची मृदा-भांगर, नवीन गाळाची मृदा-खादर.
२. काळी मृदा/ रेगूर मृदा :
→ दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात.
→ बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.
→ महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते. कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो. आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते.
→ या मातीत लोह, अॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते. तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे.
→ उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात.
→ पिके : काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते. कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे पिकवली जातात.
→ या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते.
महाराष्ट्रातील काळी मृदा :
→ सहय़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळय़ा मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते.
→ पिके : महाराष्ट्रातील सर्वोत्तम मृदेत काळी मृदा प्रसिद्ध आहे. कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस तसेच कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते.
→ पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या उत्तम सोयी उपलब्ध झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. तसेच काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते.
→ विशेषत: गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील ऊस, कापूस, तंबाखू, भुईमूग वगरेंसारखी नगदी पिके, विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे.
→ खानदेशमध्ये तापी नदीच्या खोऱ्यात कापसाच्या खालोखाल केळीच्याही बागा व इतर पिकेही आहेत.
३. जांभा मृदा :
→ सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर, पूर्व घाट, राजमहल टेकडय़ांवर, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये राधानगरी, आंध्रप्रदेशात मेडक, ओडिशात मयूरभंज येथे जांभा मृदा आढळते.
→ उष्ण कटिबंधीय प्रदेशात आद्र्र हवामानात जांभा जमीन तयार होते.
→ पावसाचे प्रमाण २०० सें.मी.पेक्षा जास्त असल्याने खडकाचे अपक्षरण होते.
→ खडकामधील सिलिकांवर अपक्षयाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होते. अशा तांबूस पिवळसर जमिनीस ‘जांभा मृदा’ असे म्हणतात.
→ अॅल्युमिनिअम ऑक्साइड व लोह ही द्रव्ये या मृदेत असतात.
→ ही मृदा फारशी सुपीक असत नाही. परंतु खताला लगेचच आणि चांगला प्रतिसाद देते.
→ या मृदेतून नाचणी, भात, कडधान्ये, ऊस ही पिके तसेच आंबा, काजूसारखी फळझाडे चांगली वाढतात.