प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात –
- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश
- उत्तर भारतीय मदानी प्रदेश
- भारतीय द्विपकल्पीय पठारी प्रदेश
- भारतीय किनारी मदानी प्रदेश
- भारतीय बेटे.
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश – हिमालय
– भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिर्वक्र आकार प्राप्त झाला आहे.
– हिमालय पर्वतप्रणाली ही गुंतागुंतीची असून हिमालयाची उत्पत्ती व क्रांती याबाबत निरनिराळ्या भूशात्रज्ञांनी वेगवेगळी मते मांडली आहेत.
– मात्र हिमालयाची उत्पत्ती महा भूसन्नती टेथिस समुद्रापासून झाली आहे आणि विविध अवस्थांमध्ये त्याचे उत्थापन झाले. यासंदर्भात भूशास्त्रज्ञांच्या मतांमध्ये एकवाक्यता दिसून येते.
– हिमालयाची उत्पत्ती संदर्भात मतांची विभागणी दोन भागांत करता येते-
१. भूसन्नतीद्वारे (through Geosyncline) हिमालयाची उत्पत्ती आणि उत्क्रांती.
२. भूपट्ट विवर्तनीद्वारे (through Plate Tectonics) हिमालयाची उत्पत्ती आणि उत्क्रांती.
हिमालय पर्वताच्या रांगा :
ट्रान्स हिमालय:
– हिमालय प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु हिमालयाच्या पर्वतरांगा आणि तिबेट पठाराच्यामध्ये असणाऱ्या रांगांना हिमालयापलीकडील पर्वतरांगा (ट्रान्स हिमालय) म्हणतात.
– बृहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत.
– याचा विस्तार पश्चिम – पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी एक हजार कि.मी. इतकी आहे.
– यात खालील रांगांचा समावेश होतो- काराकोरम रांगा, लडाख रांगा, कैलास रांगा.
अ) काराकोरम रांगा –
– भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते.
– काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी.पर्यंत आहे.
– जगातील सर्वात उंचीचे दोन क्रमांकाचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के- २ (गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे.
– जगातील काही मोठय़ा हिमनद्यांची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर.
– काराकोरम रांगेत अत्यंत उंच अशी शिखरे आहेत. काही शिखरांची उंची आठ हजार मी. पेक्षा जास्त आहे.
ब) लडाख रांग –
– सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्या दरम्यान लडाख रांग आहे.
– लडाख रांगेची लांबी ३०० कि.मी. आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.
क) कैलास रांग –
– लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
बृहद् हिमालयाची (Greater Himalaya) वैशिष्टय़े –
– लघु हिमालयाया लघु उत्तरेकडे भितीसारखी पसरलेली बृहद् हिमालयाची रांग आहे.
– बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Main central Thrust) लघु हिमालयापासून वेगळा झाला आहे.
– बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत.
– यातील बरीचशी शिखरे ही आठ हजार मी.पेक्षा जास्त आहेत.
– या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट आहे.
– या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू, धवलगिरी, अन्नपूर्णा, नंदा देवी, कामेत, नामच्या बरवा, गुरला मंधता, ब्रदीनाथ.
# लघु हिमालय /मध्य हिमालय (Lesser or Middle Himalaya) –
– मध्य हिमालयालाच ‘हिमाचल हिमालय’ असेही संबोधले जाते.
– दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लघु हिमालय पसरलेला आहे.
– लघु हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून या पर्वताची सरासरी उंची ३,५०० ते पाच हजार मी. यादरम्यान आहे.
– लघु हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो- पीरपंजाल, धौलाधर, मसुरी, नागतिब्बा, महाभारत.
पीरपंजाल –
– काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० कि.मी.पर्यंतचा आहे.
– रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
धौलाधर रांग –
– पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिद्ध आहे.
– ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
मसुरी, नागतिब्बा रांग –
– लघु हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात.
– यापकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगांचा समावेश आहेत.
महाभारत रांग –
– मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
महत्त्वाच्या खिंडी –
पीर पंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनीहल खिंड.
लघु हिमालयातील महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे- सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा (उत्तराखंड), दार्जििलग (पं. बंगाल).
महत्त्वाच्या दऱ्या
* काश्मीर दरी – पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० कि.मी. इतकी आहे.
* कांग्रा दरी – हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.
* कुलू दरी – रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
* काठमांडू दरी – नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
# शिवालीक रांगा / हिमालयापलीकडील पर्वतरांगा (Outer Himalaya) :
– हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग शिवालीक रांग आहे.
– या रांगेलाच बाह्य हिमालय असे म्हणतात.
– हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालीक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली. यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उदमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर),
– शिवालीक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.
हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण
* बुरार्ड यांच्या मतानुसार हिमालयाचे वर्गीकरण
पंजाब हिमालय, कुमाऊँ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय.
* पंजाब हिमालय – सिंधू आणि सतलज नदी यादरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून यांची लांबी ५६० कि.मी. इतकी आहे.
* कुमाँऊ हिमालय – सतलज आणि काली नदी यांदरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून यांची लांबी ३२० कि.मी. इतकी आहे.
* नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यादरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून यांची लांबी ८०० कि.मी. इतकी आहे.
* आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी ७२० कि.मी. इतकी आहे.
# पूर्वाचल –
पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर-दक्षिणेकडे जाताना यांनी टेकडय़ांची एक मालिकाच तयार केलेली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो.
* पूर्व- नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.
* पूर्व- नेफा – यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.
* मिश्मी टेकडय़ा – मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी. पेक्षा जास्त आहे.
* नागा रांगा – नागालँड आणि म्यानमार यादरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.
* मणिपूर टेकडय़ा – भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक हे सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येतो.
# हिमालयातील महत्त्वाच्या खिंडी
* जम्मू काश्मीर – अघिल खिंड, बनिहाल खिंड, पीरपंजाल खिंड, झोझी-ला, बारा-लाच्या-ला.
* हिमाचल प्रदेश – बुर्झील खिंड, रोहतांग खिंड, शिप्कीला खिंड.
* उत्तराखंड – लिपु लेक, नीती खिंड.
* सिक्कीम – जेली- प्ला, नथू-ला
__________________________
अघिल खिंड – ही खिंड लडाख आणि चीनमधील सिक्यँग प्रांताला जोडते.
बनिहाल खिंड – या खिंडीमुळे श्रीनगर – जम्मू जोडले जातात. या खिंडीतून एक बोगदा तयार केला असून याला जवाहर बोगदा असे नाव देण्यात आले आहे. पीरपंजाल खिंड, जम्मू आणि श्रीनगरला जोडणारी परंपरागत खिंड आहे.
झोझिला खिंड – यांमुळे श्रीनगर, कारगिल, लेह हे जोडले जातात. डिसेंबर ते मेपर्यंत हिमवृष्टीमुळे ही खिंड बंद असते.
बारा- लाच्याला – या खिंडीमुळे मनाली व लेह हे जोडले जातात.
बुरझिल खिंड – या खिंडीमुळे हिमाचल प्रदेश आणि लडाख हे जोडले जातात.
रोहतांग खिंड -या खिंडीमुळे हिमाचल प्रदेशातील कुलू – लाहुल – स्पिटी दऱ्या एकमेकांना जोडल्या जातात.
लि- पु लेक – उत्तराखंडातील पिढूर जिल्ह्यात लि-पु खिंड आहे. या खिंडीतूनच मानसरोवराकडे यात्रेकरू जातात. या खिंडीमुळे उत्तराखंड तिबेटकडे जोडला गेला आहे.
जे-लिप-ला खिंड – सिक्कीममधील या खिंडीमुळे सिक्कीम आणि तिबेटची राजधानी ल्हासा हे जोडले जातात.
नथुला – भारत आणि चीनच्या सरहद्दीवर नथुला ही खिंड आहे. १९६२ च्या युद्धानंतर २००६ ला ही खिंड वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केली.
उत्तर भारतीय मदानी प्रदेश
– हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्विपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे.
– उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचे मदानी प्रदेश असून पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे.
– भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० कि.मी. आहे.
– या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस कि.मी. इतके आहे.
– हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळांमुळे तयार झालेले आहे.
या मदानात पुढील प्रकारची भूरूपे आढळून येतात – भाबर मदान, तराई मदान, खादर, भांगर.
* भाबर मदान –
शिवालीक टेकडय़ांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे भाबर मदान असून हे मदान दगडगोटय़ांनी तयार झालेले आहे. या ठिकाणी खडांमध्ये असलेल्या सच्छिद्रतेमुळे बरेचसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. यामुळे पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. कृषीसाठी हा प्रदेश अनुकूल नाही.
* तराई मदान –
हिन्दी भाषेत तर याचा अर्थ ओला असा होता. भाबर पट्टय़ात भूमिगत झालेल्या नद्यांचा प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा वर येतात. यामुळे हा प्रदेश दलदलीचा झाला आहे. या प्रदेशात घनदाट वने तयार झालेली आहेत. भाबर मदानाच्या दक्षिणेकडे १५ ते ३० कि.मी. लांबीचा हा समांतर पट्टा आहे.
* भांगर मदान –
जुन्या गाळामुळे जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला भांगर असे म्हणतात. या मृदेत ह्युमसचे प्रमाण उच्च आहे. सर्वसाधारणपणे
भारतीय मदानी प्रदेशातील सर्वात सुपीक असा हा प्रदेश आहे.
* खादर मदान –
नदी प्रवाहांमुळे नवीन गाळाचा जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असे म्हणतात. खादर भूमीत वाळू, मृत्तिका आणि चिखल आढळतो. खादर मदानातील बरीचशी जमीन लागवडीखाली आलेली आहे. या जमिनीत तांदूळ, गहू, मक्का, तेलबिया यांची लागवड केली जाते.
# उत्तर भारतीय मदानाची प्रादेशिक विभागणी खालील प्रकारे केली जाते –
राजस्थान मैदान, पंजाब – हरियाणा मैदान, गंगा मैदान, ब्रह्मपुत्रा मैदान.
* राजस्थान मैदान –
– यालाच थरचे वाळवंट असे देखील म्हणतात. भारतामध्ये थरच्या वाळवंटाचे क्षेत्र सुमारे १.७५ लाख चौ. कि. मी. इतके आहे.
– या वाळवंटाची विभागणी खालील प्रकारे करतात. अ) मरुस्थळी ब) राजस्थान बगर.
अ. मरुस्थळी –
– वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळी संबोधतात.
– यात वाळूच्या टेकडय़ा आढळतात.
– सर्वसाधारणपणे मरुस्थळीचा पूर्व भाग हा खडकाळ आहे.
– तर पश्चिम भाग हा वाळूच्या स्थलांतरित टेकडय़ांनी व्यापलेला आहे.
ब) राजस्थान बगर –
– पूर्वेला अरवली पर्वताच्या कडेपासून पश्चिमेस २५ सें.मी. पर्जन्य रेषेदरम्यान राजस्थान बगर विस्तारलेला आहे.
– बगर हा सपाट पृष्ठभागाचा आहे.
– अरवली पर्वतातून वाहणारे लहान प्रवाह या बगरमधून वाहतात.
– या प्रदेशात काही वाळूच्या टेकडय़ादेखील आहेत.
– सांभर सरोवर हे सर्वात मोठे व वैशिष्टय़पूर्ण सरोवर आहे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
* पंजाब – हरियाणा मैदान –
– पंजाब हरियाणा मदानाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौ.कि.मी. इतके आहे.
– यातील पंजाब मदानामधून झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या पाच नद्या वाहतात.
– दोन नद्यांच्या दरम्यानच्या भूमीला दोआब असे म्हणतात.
* गंगा मैदान –
– भारतीय मैदानी प्रदेशातील हे सर्वात मोठे क्षेत्र आहे.
– याची पश्चिम पूर्व लांबी १४०० कि.मी. असून याची सरासरी रुंदी ३०० कि.मी. इतकी आहे.
– गंगा मैदानाचे उपविभाजन खालील प्रकारे केले जाते.
ऊर्ध्व गंगा मदान, मध्य गंगा मदान, निम्न गंगा मदान.
* ब्रह्मपुत्रा मैदान –
– या मैदानाला आसाम मैदान असेही म्हणतात.
– ब्रह्मपुत्रा मदानाची पूर्व – पश्चिम लांबी ७२० कि.मी. तर उत्तर-दक्षिण लांबी जवळ जवळ १०० कि.मी. इतकी आहे.
– भारतीय महामदानाच्या पूर्वेकडील भाग ब्रह्मपुत्रा मदान म्हणून ओळखला जातो.
– हे मैदान ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेले आहे.
ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या –
– ही जगातील मोठय़ा नद्यांपकी एक नदी असून ती तिबेटमधून दक्षिणेकडे आसाममधून बांगलादेशात प्रवेश करते.
– ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली हे बेट आहे. भारतातील नदी बेटांत याचा प्रथम क्रमांक लागतो.
संदर्भ : लोकसत्ता
लेखक – जी आर पाटील
grpatil2020@gmail.com