व्हॅन अ‍ॅलनचे पट्टे

अमेरिकेने १९५८ साली ‘एक्सप्लोरर’ मालिकेतील कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडण्यास सुरुवात केली. हे उपग्रह पृथ्वीच्या जवळ असताना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चारशे किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर, तर दूर असताना अडीच हजार किलोमीटरपेक्षा थोडय़ाशा अधिक अंतरावरून प्रवास करायचे. या कृत्रिम उपग्रहांत वैश्विक किरणांच्या अभ्यासासाठी शोधक बसवले होते. विश्वातील विविध दिशांकडून पृथ्वीवर विद्युतभारित कणांचा- वैश्विक किरणांचा – मारा होत असतो. पृथ्वी हे एक मोठे चुंबक असल्याने, या वैश्विक किरणांतील विद्युतभारित कणांच्या मार्गावर त्याचा परिणाम होणे अपेक्षित होते. पहिला ‘एक्सप्लोरर-१’ हा उपग्रह कमी उंचीवर असायचा, तेव्हा त्यातील शोधकाने मोजलेली विद्युतभारित कणांची संख्या वैश्विक किरणांच्या तीव्रतेला अनुसरून असायची. जेव्हा तो पृथ्वीपासून दूर जाऊ लागे, तेव्हा शोधकावरील विद्युतभारित कणांची नोंदही वाढू लागे. अधिक उंचीवर गेल्यानंतर मात्र हा शोधक काही वेळा बंद पडायचा. या उपग्रहावरील शोधक, पृथ्वीवरील संदेशग्राहक स्थानांवरून प्रवास करतानाच फक्त या कणांचे मापन करत असे. त्यामुळे या उपग्रहाच्या निरीक्षणांना मर्यादा होत्या.

त्यानंतरच्या ‘एक्सप्लोरर-३’ या उपग्रहातील शोधकाच्या नोंदी मात्र टेपरेकॉर्डरवर सतत नोंदवल्या जात होत्या. उपग्रह कमी उंचीवर असताना विद्युतभारित कणांची अपेक्षित संख्या दर्शवणारा यावरचा शोधकही, वाढत्या उंचीबरोबर ही संख्या वाढत असल्याचे दाखवत होता. ही संख्या वाढत जात, अखेर त्या शोधकाच्या कमाल क्षमतेपर्यंत पोचली आणि शोधकाने विद्युतभारित कणांचे मापन त्याच मूल्यावर थांबवले. त्यानंतर कणांची संख्या कमी झाल्यामुळे मापन पुन्हा सुरू होऊन ते अचानक शून्यावर आले. उपग्रह त्यानंतर पुन्हा खाली येऊ लागल्यानंतर याच सर्व क्रिया उलटय़ा क्रमाने घडून आल्या.

उपग्रहाच्या प्रवासादरम्यान, मधल्या काही उंचीवर विद्युतभारित कणांची संख्या प्रचंड असल्याचे हे द्योतक होते. सूर्याकडून येणाऱ्या शक्तिशाली विद्युतभारित कणांना (सौर वारे) पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय क्षेत्राने बाहेरच थोपवल्यामुळे तिथे ही संख्या वाढत असल्याचे, १९६२ साली सोडलेल्या ‘एक्सप्लोरर’ उपग्रहाने स्पष्ट केले. थोपवलेल्या या विद्युतभारित कणांनी पृथ्वीला पट्टय़ांच्या स्वरूपात वेढले आहे. सुमारे सातशे किलोमीटर उंचीच्या पलीकडे असणाऱ्या या पट्टय़ांचा शोध, याच मोहिमेवरील व्हॅन अ‍ॅलन या संशोधकाने लावला. त्यामुळे हे पट्टे ‘व्हॅन अ‍ॅलन पट्टे’ या नावे ओळखले जातात.

Credit : loksatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *