राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी. त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारे त्रिपाठी हे मागील बऱ्याच काळापासून आजाराने त्रस्त होते. ते ६७ वर्षांचे होते.

सुल्तानपूरमध्ये जन्म…

डी. पी. त्रिपाठी म्हणजेच देवी प्रसाद त्रिपाठी यांचा जन्म ६ जानेवारी १९५४ रोजी उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूरमध्ये झाला होता. तरुणपणी महाविद्यालयामध्ये शिकताना त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापिठातील विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी इलाहाबाद विद्यापिठामध्ये राजकारणाचे प्राध्यापक म्हणून कामही केले.

१६ व्या वर्षी राजकारणात प्रवेश

वयाच्या १६ व्या वर्षापासूनच त्रिपाठी सक्रीय राजकारणामध्ये सहभागी झाले होते. अगदी तरुण वयामध्येच त्यांना तत्कालीन युवा नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्रिपाठी हे अल्पावधीमध्येच राजीव यांच्या निटवर्तीय सहकाऱ्यांच्या गटामध्ये गणले जाऊ लागले.

सोनियांचा विरोध म्हणून काँग्रेस सोडली…

राजीव गांधींच्या निधनानंतर काही वर्षांनी सोनिया गांधीचे नेतृत्व न पटल्याने त्रिपाठी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा त्रिपाठी हे राष्ट्रवादीमध्ये गेले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात…

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच त्यांनी पक्षासाठी बरेच काम केले. त्यांनी राष्ट्रवादीचे महासचिव आणि प्रमुख प्रवक्ते म्हणून काम केले. ते ३ एप्रिल २०१२ ते २ एप्रिल २०१८ या कालावधीसाठी राज्यसभेचे खासदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *