राज्य सेवा परीक्षा स्वरूप

दरवर्षी एम.पी.एस.सी.द्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एम.पी.एस.सी. वेगवेगळय़ा परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.
एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब,  ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब  १९) नायब तहसीलदार- गट ब.

ही परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते.

  1. पूर्व परीक्षा      – ४०० गुण
  2. मुख्य परीक्षा   – ८०० गुण
  3. मुलाखत       – १०० गुण

राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 

  1. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आता एक ‘सामान्य अध्ययना’चा व दुसरा ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- सी-सॅट) असे दोन पेपर्स असतील.
  1. प्रस्तुत दोन्ही प्रश्नपत्रिका प्रत्येकी २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे.
  2. या प्रश्नपत्रिकांमध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले नाही. अर्थात याबाबतीत ‘एमपीएससी’ ‘यूपीएससी’चेच अनुकरण करण्याची शक्यता अधिक आहे.
  3. तथापि, दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्येा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असतील.

पेपर पहिला (अभ्यासक्रम):-

अ.    इतिहास घटकाचा अभ्यास वाढवून त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचा समावेश केला आहे. तसेच, भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास अवगत असणे गरजेचे आहे.

ब.    भूगोलाचाही अभ्यासक्रम व्यापक केलेला असून त्यात भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबरच जगाचा भूगोलही अभ्यासावा लागणार आहे. त्यातही प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक-लोकसंख्या भूगोलाची तयारी करावी लागणार आहे.

क.    पूर्वीच्या भारतीय राज्यघटनेऐवजी आता भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया असा उल्लेख केला आहे. यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्दे या घटकांचा समावेश केला आहे. भारतीय तसेच महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे.

ड.    भारतीय अर्थव्यवस्था या शब्दप्रयोगाऐवजी ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’ असे शीर्षक उपयोजिले आहे, ज्यात चिरंतन विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, समावेशक विकास या घटकांचा अंतर्भाव केला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भातही हा घटक अभ्यासावा लागणार.

इ.    पर्यावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण कळीचे मुद्दे हा घटक नव्यानेच नमूद केला आहे.

ई.    सामान्य विज्ञान हा घटकही कायम ठेवण्यात आला आहे.

उपरोक्त बदलामुळे सामान्य अध्ययनाची तयारी करताना जुन्या पद्धतीचा अवलंब न करता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यासघटकांचा विचार  करून आपल्या अभ्यासपद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे.

पेपर दूसरा (अभ्यासक्रम) :-

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता ‘नागरी सेवा कल चाचणी’चा केलेला समावेश हा संपूर्णत: नवा बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठी माध्यमाच्या व ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर आव्हानात्मक वाटू शकतो. तथापि, या पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यासघटकांचा पद्धतशीर विचार करून नियमित दररोज तयारी केल्यास हा पेपरदेखील सुलभ बनवता येतो. या कल चाचणीत-

१. आकलन कौशल्य

२. आंतरवैयक्तिक संभाषण व इतर कौशल्ये

३. तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता

४. निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक

५. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी

६. मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण

७. इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य

State-Services-PreliminaryExamination-syllabus

मुख्य परीक्षा :-

  • मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी व मराठी भाषांचे दोन पेपर व सामान्य अध्ययन विषयाचे चार पेपर असे एकूण सहा पेपर असतात.
  • यामध्ये मराठी व इंग्रजीचा एक पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचा असतो तर दूसरा पेपर लेखी स्वरूपाचा असतो. सामान्य अध्यायनाचे चारही पेपर मात्र वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतात.

सर्व प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :- 

अ क्र विषय गुण कालावधी
१. मराठी व इंग्रजी (Objective) १०० ३ तास
२. मराठी व इंग्रजी (Subjective) १०० ३ तास
३. सामान्य अध्ययन-१ १५० २ तास
४. सामान्य अध्ययन-२ १५० २ तास
५. सामान्य अध्ययन-३ १५० २ तास
६. सामान्य अध्ययन-४ १५० २ तास

State Service Main Examination Syllabus [In Marathi]

मुलाखत 

मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांच्या आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात.

अंतिम निकाल :

मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते.