राज्यसेवा पूर्व परीक्षा: भूगोल विषयाची तयारी कशी करावी?

 अभ्यासक्रम

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोलाच्या अभ्यासक्रमात ‘महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याच अभ्यासक्रमाची जर आपण फोड केली तर यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा रचनात्मक (Physiographic) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंखेचे स्थलांतर व त्याचे Source व Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न, कृषी परिस्थितिकी, पर्यावरणीय भूगोल या घटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर जगाच्या भूगोलाच्या संदर्भात विविध आखाते, खाडय़ा, सामुद्रधुनी आणि महासागर, आंतरराष्ट्रीय आपत्ती- तिचे साल; झालेली हानी; ठिकाण, व्यापारी केंद्रे त्यांची टोपण नावे, हवामान, भुरुपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टये या उपघटकांचा समावेश होतो.

 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला  तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.

  1. भारताच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा भर थोडा कमी कमी होऊन भौगोलिक संकल्पनांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील भर वाढत आहे.
  2. जगाच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जवळपास स्थिर आहे.
  3. महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या मात्र तुलनेने अगदीच कमी आहे.

चालू घडामोडींशी भूगोलाची सांगड
भूगोल या विषयावर गेल्या चार ते पाच वर्षांत विचारलेले प्रश्न पाहिल्यास त्यांची विभागणी आपण प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल अशा प्रमुख चार घटकांत होते. या घटकांचा अभ्यास करताना विचारले जाणारे प्रश्न कोणत्या ना कोणत्या बाजूने चालू घडामोडींशी निगडित असल्याचे जाणवते. त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासाची उजळणी करताना गेल्या वर्षभरातील घडलेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदा, संमेलने, घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत त्या ठिकाणांची एक यादी बनवून महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या नकाशात ती ठिकाणे कुठे आहेत, हे पाहून तेथील राजकीय व प्राकृतिक भौगोलिक वैशिष्टय़े लक्षात ठेवावीत. यासाठी बालाजी सुरणे लिखित चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता.

प्राकृतिक भूगोलाची तयारी
भूगोलाच्या या विभागांतर्गत मृदा, हवामान, वने, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरूपे, सूर्यमालेतील इतर ग्रहांची वैशिष्टय़े, ज्वालामुखी, भू-अंतर्गत हालचाली, पृथ्वीचे अंतरंग, बंदरे, सागरी प्रवाह यांच्याबद्दल माहिती विचारली जाते. या घटकांचा अभ्यास करताना नकाशावाचनाद्वारे कोऱ्या नकाशांवर शक्य त्या ठिकाणी वरील घटकांची माहिती भरून ते नकाशे या परीक्षेला काही दिवस उरलेले असताना नेमाने दररोज पाहावेत, जेणेकरून ते आपल्या चित्ररूपी स्मृतीत साठवले जाऊन परीक्षेच्या वेळी सहज आठवतात.

जगाच्या भूगोलाची तयारी
या विभागात साधारणपणे विविध आखाते, खाडय़ा, सामुद्रधुनी आणि महासागर, आंतरराष्ट्रीय आपत्ती तिचे वर्ष; झालेली हानी; ठिकाण, व्यापारी केंद्रे; त्यांची टोपणनावे, हवामान, भुरूपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टय़े या उपघटकांवर प्रश्न विचारले जातात. या घटकांचा अभ्यास करताना सहावी, सातवी, आठवी तसेच अकरावी व बारावीची पाठय़पुस्तके आणि त्यामधील नकाशे अत्यंत उपयुक्त ठरतात.
भारताच्या भूगोलाची तयारी
या विभागात साधारणपणे भारतातील मृदा समस्या, मासेमारी, वस्त्या (मानवी भूगोल), नद्यांची खोरी- त्यांचा आकार, हवामान, पशुधन, महत्त्वाची शहरे- त्यांची टोपणनावे, लोकसंख्या वितरण, साक्षरता, कृषीचे प्रकार, वने, प्रमुख पिके- नगदी व अन्नधान्य- त्यांचे वितरण, विकसित बंदरे, व्यापारी केंद्रे, आदिवासी जमाती- राज्ये, पठारे, पर्वतरांगा, पर्जन्य, धबधबे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, कृषी क्षेत्रातील विविध क्रांती या उपघटकांवर विशेष भर दिला जातो. या उपघटकांचा अभ्यास करण्यासाठी इयत्ता दहावीचे पाठय़पुस्तक, ‘एनसीईआरटी’चे नववी- दहावीचे पाठय़पुस्तक आणि त्यातील नकाशांचा अभ्यास करावा.
महाराष्ट्राच्या भूगोलाची तयारी
या विभागात साधारणपणे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, मृदा, हवामान, पर्वतरांगा, नद्या, खाडय़ा, बंदरे, लोकसंख्या वितरण, पिके, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन व पर्यटन या उपघटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. २०१३ साली परीक्षेचे स्वरूप बदलल्यापासून या घटकावरील प्रश्नांची संख्या जरी कमी असली तरी वरील अपेक्षित घटकांचा अभ्यास चौथी व नववीच्या पाठय़पुस्तकांमधून करणे अपरिहार्य ठरते.
परीक्षेला जाता जाता..
एकूणच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोल या विषयाचा अभ्यास करताना योग्य त्या रणनीतीने अभ्यास केल्यास या विषयावर आधारित १० ते १३ प्रश्नांना सामोरे जाणे निश्चितच शक्य आहे. त्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
* दिलेला अभ्यासक्रम नीट लक्षात घेणे.
* चालू घडामोडींची दिलेल्या अभ्यासक्रमाशी सांगड घालणे.
* सरावासाठी प्राकृतिक भूगोलातील घटकांचे नकाशे तयार करून नियमितपणे पाहणे.
* नद्यांचा, पर्वतरांगांचा, खाडय़ांचा, बंदरांचा दक्षिणोत्तर अथवा उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम अथवा पश्चिम-पूर्व क्रम ध्यानात ठेवणे.
* कोणते उपघटक कोणत्या स्रोतामधून वाचायचे आहेत त्याची यादी बनवणे व ते घटक पूर्णपणे वाचून त्यांची वारंवार उजळणी करणे. त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेणे.

संदर्भ साहित्य :- 

  1. पाचवी ते बारावी भूगोलाची शालेय पुस्तके
  2. ऑक्सफोर्ड अॅटलस (नकाशे अभ्यासण्यासाठी)
  3. महाराष्ट्रचा भूगोल :- सवदी किंवा खतीब किंवा दीपस्तंभ (यापैकी कोणतेही एक)
  4. भारताचा भूगोल : अकरावी NCERT किंवा माजिद हुसेन
  5. भूगोल व पर्यावरण :- ए. बी. सवदी

One thought on “राज्यसेवा पूर्व परीक्षा: भूगोल विषयाची तयारी कशी करावी?”

Leave a Reply

Your email address will not be published.