महाराष्ट्रचा भूगोल : खनिजे

जॉइन करा आमचे Telegram चॅनल >> telegram.me/mpscmantra

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

मँगनिज 

भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.

० भंडारा –  या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.

० नागपुर – या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.

० सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.

लोहखनिज 

भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.  पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.

० चंद्रपूर – चिमुर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. 

० गडचिरोली – गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात. 

० गोंदिया – गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.

० सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत. 

० कोल्हापुर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.

बॉक्साइट 

याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१% बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.

० कोल्हापूर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते.

० रायगड – या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने     मुरुड,   रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.

० ठाणे – या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.

चुनखडी 

बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात.

० यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्य़ात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, इ. ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.

० चंद्रपूर – या जिल्ह्य़ात बरोडा व नाजोरा तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात.

डोलोमाइट 

याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलाद निर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्य़ांतही थोडे साठे आढळतात. भारतातील डोलोमाइटच्या एकूण साठय़ांपकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.

कायनाइट व सिलीमनाइट 

हिऱ्यांना पलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिंमेट उद्योग, इ. ठिकाणी कायनाइटचा उपयोग होतो. महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात कायनाइटचे साठे आढळतात.

मीठ 

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत विशेषत: रायगड, ठाणे, मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते. मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो.

संदर्भ : लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *