ट्रायल आणि एरर’मध्ये अडकणाऱ्यांसाठी ही परीक्षा नाही

● ट्रायल आणि एरर’मध्ये अडकणाऱ्यांसाठी ही परीक्षा नाही:-प्रसाद चौगुले (राज्यसेवा परीक्षेत प्रथम,उपजिल्हाधिकारी पदी निवड)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

● MPSCचा अभ्यास सुरू करताना तुमचा वर्षभराचा प्लॅन तयार असायला पाहिजे. जेणेकरुन तुमचा वेळ वाचू शकतो. नाहीतर ‘ट्रायल आणि एरर’मध्येच अनेकजण अडकतात. ही परीक्षा अशा लोकांसाठी मुळीच नाहीये. सॉलिड प्लॅन केला तर लवकरात लवकर यश मिळू शकतं. एकदा का पूर्वपरीक्षा नापास झाला तर तुमची पुढची अडीच वर्षे वाया जातात.”

● मूळचा साताऱ्याच्या कराडमधला असलेला प्रसाद हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. 2017 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर प्रसादचं शेवटच्या वर्षी कँपसमधून प्लेसमेंट झाली पुण्यात त्याने एक वर्ष नोकरी केली. पण कार्पोरेट जगात मन रमलं नाही. म्हणून जुलै 2018मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यात MPSCची तयारी सुरू केली.

● प्रसादचे वडील MSEBमध्ये (Maharashtra State Electricty Board) ऑपरेटर आहेत. आई गृहिणी आहे. प्रसादचं शालेय शिक्षण हे आदर्श विद्या मंदीर उंब्रज इथं झालं. त्याचं माध्यमिक शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय सातारा इथं झालं.

कराडमधल्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून त्यांनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. एक वर्षं नोकरी केली तेव्हाच प्रसादने MPSC च्या अभ्यासासाठी पैसे साठवले होते, जेणकरून तयारी दरम्यान घरच्यांवर ताण येणार नाही.

अभ्यासाची तयारी कशी करावी?

●पूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करा.

●स्पीड रीडिंग करायला शिका.

●वर्तमान पत्रावर वेळ घालवू नका.

●रोज MCQ सोडवा.

●मुख्य परीक्षेची आधी तयारी करा.

●इंग्लिश आणि मराठीचा पेपरकडे गांभीर्यानं पाहा

●कोचिंग क्लासची गरज नाही पण…

“MPSC च्या अभ्यासाच्या सुरुवातीला वर्षभराचं प्लॅनिंग करायला पाहिजे. सगळा सिलॅबस समजून घ्यावा. आधीच्या प्रश्नपत्रिका चाळाव्यात. आयोगाने कोणत्या विषयाला किती महत्त्व दिलं आहे, ते बारकाईने पाहावं. मग तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे एकंदर आपला दृष्टिकोन कसा असावा हे लक्षात येतं. अभ्यासाच्या सुरुवातीला रेफरन्स बुक्स वाचावीत,” असं प्रसादनं सांगितलं.

कोणतंही वाचन करताना मी वाचनात स्पीड ठेवला. आवाका मोठा असल्यानं ते उरकण्यासाठी जलद वाचनाची सवय करून घ्यायला पाहिजे. अभ्यास करताना तसंच परीक्षेच्यावेळीही याचा खूप फायदा होतो. कारण सगळेच पेपर वेळेत सोडवता येत नाहीत. तुमच्या कामात स्पीड असेल तर ते सहज शक्य आहे. सकाळचा वेळ बेसिक किंवा रेफरन्स बुक्स यावर घालवला, तर दुपारी अगदी 20-30 मिनिटे न्युजपेपर वाचायचो. पण अनेकजण पेपरमध्येच खूप वेळ घालवतात. ते मला वाटतं योग्य नाहीये. पेपरमधल्या सगळ्याच बातम्या महत्त्वाच्या नसतात. ठराविक बातम्या वाचायला पाहिजेत.”

दररोज केवळ अभ्यास करणं चुकीचं आहे. दिवसभरातला काहीवेळ हा जुने प्रश्न सोडवण्यात घालवला पाहिजे, असंही प्रसादला वाटतं.

“मी रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर 40 ते 50 MCQ (Multiple Choice Questions) सोडवायचो. मला वाटतं त्याचा मला सगळ्यात जास्त फायदा झालाय. सकाळी 7 च्याआधीच मी लायब्ररीत जायचो. एकावेळी मी एकाच विषयाचा अभ्यास करायचो. संध्याकाळी त्या विषयाचे प्रश्न सोडवायचो,” प्रसाद सांगतो.

“मी मुख्य परीक्षेचा जवळजवळ 70 ते 80 टक्के अभ्यास हा पूर्व परीक्षेच्याआधीच केला. मग शेवटच्या 3 महिन्यात पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कारण मुख्य परीक्षा तुमचं भवितव्य ठरवते आणि पूर्व परीक्षेनंतर त्याच्या अभ्यासाला वेळ पुरत नसल्याचं,” प्रसाद सांगतो.

मुख्य परीक्षेत मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो. अनेकजण तो पेपर गांभीर्यानं घेत नाहीत. त्याचा व्यवस्थित अभ्यास करत नाहीत. पण ते हक्काचे मार्क्स असतात. रोज थोडा अभ्यास केला तर ती गुंतवणूक असते. कारण इतर ठिकाणी MCQमध्ये मार्क्स जाण्याची शक्यता असते, याउलट मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये तसं सहसा होत नाही. Authentic किंवा ठोस माहितीवर भर असावा. त्यासाठी इकॉनॉमिक सर्व्हे, इंडिया इअर बुक वाचावेत. तर सरकारी वेबसाईट दोन्ही परीक्षेच्याआधी चाळून घ्याव्यात.

दरम्यान, MPSC/UPSCचा अभ्यास म्हटलं की कोचिंग क्लासेस आले. त्यासाठी भरमसाट पैसे मोजावे लागतात. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी तर त्यांचं मोठं प्रस्थ आहे. पण मुळात कोचिंगची गरज आहे का ? असं विचारलं असता प्रसाद सांगतो, “पैसे देऊन कोचिंग क्लासेस करावेत असा काही नियम नाहीये. पण योग्य मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. मला माझ्या दाजींनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. ते MPSCचे क्लासेस घेतात. माझ्यामते तुमचे सिनिअर्स किंवा ही परीक्षा पास झालेल्यांकडून मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुमचा यात वेळ जाऊ शकतो.”

MPSC/UPSC ची परीक्षा पहिल्यांदा देणाऱ्यांसाठी कानमंत्र

बऱ्याच मुली आणि मुलं MPSC/UPSC क्षेत्राकडं वळत आहेत. स्पर्धा परीक्षेचं आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये आहे.

“नव्यानं या क्षेत्रात येण

ाऱ्यांना मी सांगू इच्छितो की,र्षभराचा एक चांगला प्लॅन करा. एक ते दीड वर्षं अभ्यास करावा लागणार आहे. तुमचे स्ट्राँग आणि वीक पॉईंट्स जाणून घ्या. कोणते विषय सोपे आणि अवघड आहेत. त्याप्रमाणे फोकस करा. कारण यात ट्रायल आणि एररला काही स्कोप नाहीये. एक पूर्वपरीक्षा नापास झाला तर तुमची आणखी अडीच वर्षे वाढत असतात,” असंही प्रसादने सांगितलं.पहिलं पाऊल घेण्याआधी आपण हे का करतोय? खरंच करायचं आहे की मित्रमैत्रिणींमुळे आपण हे करत आहोत? याचा आधी विचार करावा. या क्षेत्राची सगळी माहिती घेऊनच सुरुवात करा, असं प्रसादला वाटतं.

● अभ्यास करुनही यश हुलकावणी देत असेल तर काय?

● साधारण वय वर्ष 21 नंतर अनेकजण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. यात ग्रामीण भागातून आलेल्या मुलांचा टक्का जास्त आहे. पुणे-मुंबई-नाशिक-नागपूर अशा ठिकाणी राहून अभ्यास करतात. कोचिंग क्लासेसची भरमसाट फी भरतात. पण शेवटी हाताला यश लागत नाही. या सगळ्या प्रक्रियेत मुलांची 5-6 वर्षं जातात. आयुष्याच्या उमेदीची वर्षं इथं घालवल्यानंतर हातात ग्रॅज्युएशन शिवाय काय राहत नाही. मग मार्केटमध्ये जॉब मिळत नाही.

● अशी परिस्थिती ओढवण्याच्या आधी काय करावं, असा प्रश्न विचारला असता प्रसाद सांगतो, “अनेकदा मेहनत घेऊनही फळ मिळत नाही. थोड्याफार मार्कांनी परीक्षा पास होत नाही. मग मला वाटतं तुम्ही स्वत:च कितीवेळा परीक्षा द्यायची ते ठरवा. 2-3 वर्षं जीव तोडून अभ्यास करुनही होत नसेल तर तुम्ही प्लॅन B तयार ठेवा. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाहीये. इतर अनेक क्षेत्र आहेत जिथं तुम्ही यापेक्षा चांगलं काम करू शकता. देशसेवा करू शकता.”
( सौजन्य :-बीबीसी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *