जैवतंत्रज्ञान (भाग १)

व्याख्या- जैवतंत्रज्ञान म्हणजे सूक्ष्म जीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, जीव-रसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करणे. थोडक्यात जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतींचा उपयोग तांत्रिकरीत्या करून मानवास उपयुक्त असे विविध उत्पादन करणे.

जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो :-

१) सूक्ष्म जीवांचा वापर करून घेणे. उदा. मळीपासून दारू तयार करणे, दुधापासून दही तयार करणे तसेच जिवाणूंचा वापर करून टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणे इ.
२) डी.एन.ए., प्रथिने इ. जैविक रेणूंचा वापर मानवी फायद्यासाठी करणे.
३) विशिष्ट पेशीद्रव्ये, जीवनसत्त्वे, लसी इ.चे उत्पादन करणे.
४) जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या वनस्पती व प्राणी यांची निर्मिती/ हव्या त्या पदार्थाची निर्मिती करणे. उदा. जिवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा वापर मानवी हार्मोन्स तयार करण्यासाठी करणे.

जैवतंत्रज्ञानाचे प्रकार :-

अ) अजनुकीय जैवतंत्रज्ञान- यात संपूर्ण पेशी, ऊती किंवा पूर्ण वैयक्तिक जीवाचा उपयोग केला जातो. उदा. वनस्पतीमधील ऊतीसंवर्धन संकरित बियाण्यांची निर्मिती.
ब) जनुकीय जैवतंत्रज्ञान- यात पेशीतील जनुकांमध्ये बदल घडवून आणून किंवा एका सजीवातील जनुक दुसऱ्या सजीवात टाकले जातात. याला जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering) असेदेखील म्हणतात.

जैवतंत्रज्ञान व भारत :-

▶ जैवतंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात प्रगती होत होती. भारतालाही या प्रगतीचा लाभ व्हावा तसेच देशात या नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळावी म्हणून १९८२ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली.
▶ या मंडळाने जैवतंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
▶ पुढे १९८६ मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान व तंत्रज्ञान मंडळांतर्गत काम करणारा जैवतंत्रज्ञान विभाग (Genetically Modified -GM)) निर्माण केला.
▶ जैवतंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांचे नियोजन, त्यांमध्ये सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी या विभागाकडे आली.

जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली :-

▶ जैवतंत्रज्ञानाच्या माहितीची देवाणघेवाण करणे, तिचा साठा करणे, यासाठी १९८७ मध्ये जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली अस्तित्वात आली.
▶ नवीन तंत्राच्या साहाय्याने माहिती मिळविणे, ती संकलित करणे, ती साठविणे व जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रणालीचा वापर करणे. यासाठी जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली उभी करण्यात आली.
▶ जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे.
▶ या प्रणालीच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञानाची माहिती अद्ययावत करणे यासाठी विशेष माहिती कोश करण्यात आला.

जनुकीयदृष्टय़ा उन्नत पिके (Genetically Modified -GM) :-

▶ बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साठय़ामध्ये टाकून मिळविण्यात आलेल्या इच्छित पिकाच्या गुणधर्माला जनुकीयदृष्टय़ा उन्नत पिके असे म्हणतात.
▶ या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती, रोगप्रतिकार जाती, तणनाशक जाती तसेच दुष्काळात तग धरू शकणाऱ्या जाती निर्माण करता येतात.
▶ उदा. बी. टी. कॉटन, बी. टी. वांगे इ.

बी. टी. कॉटन :-

▶ पारंपरिक व नसíगक कापसाच्या जातीला कीटकांपासून नुकसान होते. यापासून बचावासाठी रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करता येऊ शकतो, परंतु या रासायनिक कीटकनाशकांचा पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कापसाचे बी. टी. कापूस ही जात विकसित झाली आहे.
▶ यात बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या जिवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून ते कापसाच्या बियाण्यांमध्ये टाकले जाते.
▶ बॅसिलस थुरिंजिनेसिसमध्ये कापसावर पडणाऱ्या बोंडअळीविरुद्ध विषारी तत्त्व तयार करण्याची क्षमता आहे. हा विषारी पदार्थ म्हणजे एक प्रकारे प्रथिने असते.
▶ ही प्रथिने बोंडअळीच्या पोटात गेल्यानंतर पचन संस्थेच्या कार्यात अडथळा येऊन बोंडअळी मरण पावते. मात्र विषारी प्रथिने मानवाला व इतर प्राण्यांना हानिकारक नसतात. अशा प्रकारे बी. टी. कापूस बोंडअळीपासून स्वत:चे संरक्षण करते व पिकांची हानी टळते.
▶ शास्त्रज्ञांनी अशाच प्रकारे बी. टी. वांग्याची जात तयार केली आहे. स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी तांदळाच्या गोल्डन राइसची निर्मिती केली आहे.
त्यामध्ये जीवनसत्त्व अ निर्माण करणारे जीन टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.