चालू घडामोडी : 31 ऑक्टोबर 2019

अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्या मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. 1 जानेवारी पासून त्यांनी प्रधान सचिवपदाची सूत्र हाती घेतली. प्रशिक्षणानंतर अश्विनी भिडे यांचं पहिलं पोस्टिंग इचलकरंजी येथे करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी साहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांनी विकासकामांवर भर दिला. कमी खर्चात सूक्ष्म जलसिंचन करणारे रानजाई पद्धतीचे बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला. २०१४-१५ या एका वर्षांत शिक्षण खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.

मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर रोजी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून 31 डिसेंबर रोजी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपीन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे ?
नरवणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. शीख लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लष्कराच्या विविध विभागांत पुढे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधातील कारवायांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीदेखील आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग. लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *