चालू घडामोडी : 27 मार्च 2020

करोनाविरोधातील लढ्यात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश

भारतीय शास्त्रज्ञांनी करोना विषाणूची माइक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणले आहे. ३० जून रोजी केरळमध्ये भारतातील करोना पहिला रुग्ण सापडला होता. भारतीय शास्त्रज्ञांनी या रुग्णाच्या घशाचा द्रव घेतला होता. त्यावरुन भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन कऱण्यात आले. यासंबंधीचा पूर्ण अभ्यास आणि माहिती इंडियन जनरल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (IJMR) छापण्यात आली आहे.

ऑपरेशन नमस्ते

करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. Indian Army has code-named its anti #COVID19 operations as Operation Namaste. Army has, so far, established eight quarantine facilities across the country.

ऑपरेशन ब्लॅकस्टार

अफगाणिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. बुधवारी शोर बाजार येथील गुरु हर राय गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबाचा हात आहे. खरंतर भारतीय दूतावास त्यांचा टार्गेट होता. पण मोठया प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त असल्यामुळे त्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला. गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असली तरी त्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा असल्याचे भारतीय आणि पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये २८ भाविकांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. गोळीबार सुरु असताना ८५ जणांची सुटका करण्यात आली. भारतीय दूतावासापासून तीन किलोमीटर अंतरावर हा गुरुद्वारा आहे. पाकिस्तानच्यावतीने तालिबानच्या क्वेटा शुराने या हल्ल्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याच्या उद्देश या हल्ल्यामागे होता. पाकिस्तानच्या ISI चा या हल्ल्यामध्ये सहभाग असून त्यांनी ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ नाव दिले होते.

सतीश गुजराल यांचं निधन

सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. भारताचे माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचे ते भाऊ होते. कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. याचसोबत सतीश गुजराल यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार चित्रकलेतील योगदानासाठी आणि एक राष्ट्रीय पुरस्कार शिल्पकलेतील योगदानासाठी देण्यात आला आहे. सतीश गुजराल यांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ रोजी झाला होता. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकला आणि ग्राफिक डिझाईन याचं प्रशिक्षण घेतलं होतं. १९४४ मध्ये ते मुंबईत निघून आले. त्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलेचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली मात्र १९४७ मध्ये ते आजारी झाले. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. आपल्या वेगळ्या शैलीच्या चित्रकलेसाठी ते ओळखले जातात. त्यांची चित्रं भावनाप्रधान असतात. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सतीश गुजराल यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेक्सिकोचा लिओ नार्डो द विन्सी आणि बेल्जियम येथील राजातर्फे गार्ड ऑफ क्राऊन या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.

चीनने UNSC मध्ये रोखली करोना व्हायरसवरील बैठक

युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. पण चीनने UNSC मध्ये आपल्या विशेषधिकाराचा वापर करुन करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. इस्तोनिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य आहे. आफ्रिका खंडातून उदभवलेल्या इबोला आजाराच्यावेळी सुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बैठक झाली होती.

देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे. ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे. ओदिशा सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओदिशा देशातील पहिले राज्य ठरणार आहे. दुसरीकडे आसाम सरकारने देखीळ करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुवाहाटीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे.

आरबीआयने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.

गरीब कल्याण पॅकेज

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची गरीब, मजूर शेतकऱ्यांना तसेच संघटित क्षेत्रातील कामगारांना झळ बसू नये यासाठी सरकारने आपली तिजोरी मोकळी केली असून १.७० लाख कोटी रुपयांचे ‘गरीब कल्याण पॅकेज’ सरकारने जाहीर केले.
असे असेल पॅकेज :-
१. कोरोनाच्या जीवघेण्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय साहाय्यक, तंत्रज्ञ स्वच्छता कर्मचारी, आशा सेविकांना यांना ५० लाख रुपयांचे वैद्यकीय विमा संरक्षण. २० लाख लोकांना याचा थेट लाभ.
२. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य मिळणार. सध्या मिळणाऱ्या दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ या धान्य साठ्याव्यतिरिक्त पुढील तीन महिने प्रतिव्यक्ती अतिरिक्त पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत मिळतील. तसेच प्रति कुटुंब एक किलो डाळही मोफत मिळेल.
३. पीएम किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. या योजनेचा पहिला हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच थेट बँक खात्यात जमा केला जाईल. ८.६९ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
४. ग्रामीण भागात मनरेगाची मजुरी वाढविण्यात आली असून याचा लाभ पाच कोटी कुटुंबांना होणार. प्रतिदिन मजूरी १८२ रुपयांवरून २०२ रुपये वाढविण्यात आली आहे. यामुळे मनरेगा मजुरांच्या मासिक उत्पन्नात २००० रुपयांची वाढ होईल.
५. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना १००० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार. पुढील तीन महिन्यांत दोन टप्प्यात ही रक्कम मिळेल. याचा लाभ तीन कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना मिळेल.
६. देशभरातील २० कोटी महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान पुढील तीन महिन्यांसाठी मिळेल.
७. उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ८.३० कोटी बीपीएल कुटुंबांना पुढील तीन महिन्यांसाठी स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर मोफत मिळणार
८. देशातील ६३ लाख महिला बचत गटांना दीनदयाळ राष्ट्रीय ग्रामीण उपजजीविका योजनेंतर्गत मिळणाऱ्या विनातारण अर्थसहाय्याची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे.
९. संघटीत क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत पुढील तीन महिने केंद्र सरकार रक्कम जमा करणार. १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, अशा आस्थापना, कंपन्यांमध्ये १५ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन असलेले कर्मचारी आणि नोकरी देणारी संस्था अथवा मालक यांचा भविष्य निर्वाह निधीतील सहभाग (ईपीएफ कॉन्ट्रिब्यूशन) प्रत्येकी १२ टक्के असा एकूण २४ टक्के सहभाग पुढील तीन महिन्यांपर्यंत केंद्र सरकारतर्फे दिला जाईल. याचा संघटीत क्षेत्रातील ४ लाख कंपन्या, संस्थांमधील ८० लाख कर्मचाऱ्यांना फायदा मिळेल.
१०. भविष्य निर्वाह निधीतील विनापरतावा आगाऊ (नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स) रक्कम घेण्याच्या नियमांमध्येही शिथिलता आणणार. यामुळे कर्मचाऱ्यांना ७५ टक्के नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स किंवा ३ महिन्यांपर्यंतचे वेतन यातील जी रक्कम कमी असेल, तेवढी रक्कम भविष्य निर्वाह निधीतून काढता येईल. ४.८० कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळेल.
११. बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठीच्या राज्यांच्या महामंडळांकडे उपकराच्या माध्यमातून जमा झालेला ३१ हजार कोटी रुपयांचा कल्याण निधी राज्यांना बांधकाम मजुरांसाठी वापरता येईल. या क्षेत्रात साडेतीन कोटी मजूर नोंदणीकृत आहेत.
१२. राज्यांकडे जमा असलेला डिस्ट्रिक मिनरल फंड देखील कोरोनाची चाचणी आणि अन्य वैद्यकीय उपचारांसाठी वापरता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *