चालू घडामोडी : 11 फेब्रुवारी 2020

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर शिक्कामोर्तब

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी २०२० रोजी शिक्कामोर्तब केले. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याआधी प्राथमिक चौकशी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ज्या प्रकरणात गुन्हा घडल्याचे सकृद्दर्शनी आढळत नाही अशाच प्रकरणात न्यायालय अटकपूर्व जामीन देऊ शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या एका निकालामुळे कठोर मानल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील काही तरतुदी सौम्य झाल्या होत्या. हा निकाल निष्प्रभ करण्यासाठी सरकारने २०१८ मध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर केले. त्यानंतर निकालाचा फेरविचार करण्यासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या कायद्यातील दुरुस्त्यांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या जानेवारीत नकार दिला होता. अखेर न्यायालयाने दुरुस्तीवर शिक्कामोर्तब केले.

२० मार्च २०१८ मध्ये न्यायमूर्ती ए. के. गोयल, यू. यू. ललित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्या निकालात न्यायालयाने अशा प्रकरणात समिती अथवा वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय अटक करता येणार नाही. तसेच अॅट्रॉसिटी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. तसेच आरोपींना जामीनाचा मार्गही मोकळा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात पुन्हा दुरूस्ती केली होती. या दुरूस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होते. ३ ऑक्टोबर  २०१९मध्ये न्यायालयाने या संबंधीतील निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मिश्रा, विनित सरन, रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. आज निकाल देताना कायद्यात केलेली दुरूस्ती ही संविधानाच्या चौकटीतच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

ऑस्कर पुरस्कार 2020

 • ‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. 1929 साली सुरु झालेल्या या पुरस्काराचे यंदाचे 92वे वर्ष आहे.
 • यंदाच्या ऑस्करमध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं पटकावली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण ११ विभागांमध्ये जोकरनं नामांकन मिळवली आहेत.
 • या पार्श्वभूमीवर सर्वाधिक पुरस्कार पटकावण्याची संधी याच चित्रपटातील कलाकारांकडे असल्याचे म्हटले जात आहे.
  याशिवाय क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकनं जाहीर झाली आहेत.
 • तसेच दक्षिण कोरियातील ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सहा नामांकनं मिळाली आहेत. ‘पॅरासाइट’ हा चित्रपट यंदाचे खरे आकर्षण आहे. कारण इंग्रजी नसतानाही या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादित नामांकन मिळालं आहे.
  ९२ व्या ऑस्कर विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – कंसात चित्रपटाचे नाव 
  सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाइट 
  सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – पॅरासाइट 
  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो (पॅरासाइट) 
  उत्कृष्ट पटकथा – बाँग जून हो आणि जिन वोन (पॅरासाइट) 
  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -रिनी झेलवेगरला (ज्युडी) 
  सर्वोत्कृष्ट अभिनेता – जोक्विन फिनिक्स (जोकर) 
  सहायक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड) 
  सहायक अभिनेत्री – लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी) 
  उत्कृष्ट गाणे – आय एम गोना लव्ह मी अगेन- एल्टन जॉन (रॉकेटमॅन) 
  मूळ गीत – हिल्डर गुडनाडोटायर (जोकर) 
  उत्कृष्ट आधारित पटकथा – टायका वैयतिटी (जोजो रॅबिट) 
  सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट – जोश कुली, मार्क आणि जोनास रिव्हेरा ‘टॉय स्टोरी ४’साठी 
  सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट – मॅथ्यू ए चेरी आणि करेन रुपर्ट टॉलिव्हर यांना ‘हेअर लव्ह’साठी 
  लाइव्ह ॲक्शन लघुपट – माशर्ल चेरी यांना ‘द नेबर्स विंडो’साठी 
  उत्कृष्ट निर्मिती – बार्बरा लिंग आणि नॅन्सी हेग (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड) 
  उत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन ड्युरेन (लिटिल वुमेन) 
  उत्कृष्ट माहितीपट – स्ट्वेन बोग्ना, ज्युलिया रिशेर्ट आणि जेफ रिशेर्ट (अमेरिकन फॅक्टरी) 
  लघू माहितीपट – डॉन सिल्व्हेस्टर (फोर्ड व्हर्सेस फेरारी) 
  उत्कृष्ट ध्‍वनिमुद्रण – १९१७ 
  उत्कृष्ट छायांकन – रॉजर डिकिन्स (१९१७) 
  उत्कृष्ट संपादन – मायकेल मॅककुस्कर आणि अन्ड्र्यू बकलँड (फोर्ड व्हर्सेस फेरारी) 
  उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट – गिलुमे रोशेरॉन, गर्ग बटलर आणि डॉमनिक ट्युशे (१९७१) 
  उत्कृष्ट रंगभूषा आणि केशरचना – काझू हिरो, ॲनी मार्गन आणि व्हिव्हियन बेकर (बॉम्बशेल)  (Source : Sakal)

विवेक प्रसादला ‘उदयोन्मुख हॉकीपटू’चा पुरस्कार

भारताचा विवेक सागर प्रसाद याची ‘२०१९ मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय हॉकीपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) १० फेब्रुवारी रोजी विवेकच्या नावाची घोषणा करण्यात आली. विवेकला सर्व राष्ट्रीय संघटनांकडून ५० टक्के, प्रसारमाध्यमांकडून २३ टक्के, चाहत्यांकडून १५.१ टक्के मते मिळाली होती. विवेकने हे यश मिळवताना अर्जेटिनाचा मायको कॅसेला आणि ऑस्ट्रेलियाचा ब्लेक गोव्हर्स यांना मागे टाकले. कॅसेला याला २२ टक्के मते आणि गोव्हर्सला २०.९ टक्के मते मिळाली. (Source : Loksatta)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. गेल्या वेळच्या २०१५ मधील मतदानापेक्षा यंदा सुमारे पाच टक्के मतदान कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सर्वाधिक ७१.६ टक्के मतदान बल्लीमारन मतदारसंघात, तर सर्वांत कमी मतदान दिल्ली कॅंटोन्मेंटमध्ये ४५.४ टक्के झाले.

ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सुपरओव्हरसाठी नवे नियम

टी20 क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटला तर होणाऱ्या सुपर ओव्हरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज नवे नियम जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टी20 मालिकेपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
असे आहेत नवे नियम :-

 1. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळविली जाईल. जर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली तर सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळविण्यात येतील.
 2. सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघाला एक षटक खेळावे लागेल. सर्वाधिक धावा करणाऱ्या संघ सामना जिंकेल.
 3. सुपर ओव्हरमधील षटकात ज्या संघाचे दोन फलंदाज बाद होतील त्याचा डाव संपल्याचे घोषित करण्यात येईल.
 4. सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू (डीआरएस) घेता येईल. सामन्यामध्ये किती रिव्ह्यू घेतले याचा सुपर ओव्हरशी काहीही संबंध नाही.
 5. हवामानाच्या व्यत्ययामुळे जर सुपर ओव्हर लांबली तर सामनाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळी ती घेण्यात येईल. इतरवेळी सामन्यानतंर पाच मिनिटांमध्ये सुपर ओव्हर होईल.
 6. सुपर ओव्हर सुरु असताना कोणताही अडथळा आल्यास ती पूर्ण करण्यासाठी जादा वेळ दिलेली आहे त्यात ती पूर्ण केली जाईल. (Source : Sakal)

महात्मा गांधींवर अभ्यासक्रम

केंद्र सरकारने देशभरातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘आजच्या जगातील महात्मा गांधींची समर्पकता’ या विषयावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. कार्मिक मंत्रालयाने १० फेब्रुवारी रोजी याविषयी माहिती दिली. या अभ्यासक्रमामध्ये गांधींची तत्त्वे व नैतिकता, अहिंसा आणि शांततावादी चळवळ आदी विषयांचा समावेश आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (इग्नू) सेंटर फॉर गांधी अँड पीस आणि गांधी स्मृती व दर्शन समिती (जीएस अँड डीएस), राजघाट या केंद्रांच्या सल्ल्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम तीन विभागांमध्ये विभागण्यात आला असून, प्रत्येक विभागामध्ये चार विषय असतील. सरकारी सेवेतील ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ प्रवर्गातील अधिकारी या अभ्यासक्रमाच्या अध्ययनासाठी पात्र आहेत. (Source : Maharashtra Times)

स्थलांतरित प्रजातींबाबत संयुक्त राष्ट्रांची परिषद

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत करार केलेल्या देशांची, स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींचे संवर्धन या विषयावर परिषद होणार आहे. गुजरातमधल्या गांधीनगर येथे 17 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणाऱ्या या परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेला 130 देशांचे प्रतिनिधी, तज्ञ, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (Source : pib)

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2018-19

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2018-19 10 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आले. सर्वेक्षणानुसार 31 मार्च 2019 पर्यंत देशात 348 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असून 249 कार्यान्वित आहेत. 31 मार्च 2019 नुसार सार्वजनिक उपक्रमातील वित्तीय गुंतवणूक 16,40,628 कोटी रुपये असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 14.65 टक्के वृद्धी आहे.सर्व कार्यान्वित सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील सकल महसूल 2018-19 मध्ये 25,43,370 कोटी रुपये राहिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 18.03 टक्के वृद्धी झाली आहे. नफ्यातील 178 उपक्रमांचा नफा 2018-19 मध्ये 1,74,587 कोटी रुपये राहिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 11.96 टक्के वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *