चालू घडामोडी – ४ जून २०२१

चालू घडामोडी - ४ जून २०२१
चालू घडामोडी – ४ जून २०२१

महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना

 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
 • या वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापनामध्ये एक लाख युवकांना शिकाऊ उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • पुढील पाच वर्षात पाच लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
 • योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्या वेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन दिले जाईल.
 • औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उपयोगी पडतील अशा ७१५ व्यवसायांना ही योजना लागू केली आहे.

शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

 • ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मुख्यालयासमोर ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे.
 • पुणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम या वर्षीपासून राज्यभर लागू करण्यात आला आहे.
 • या गुढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच शुभचिन्हांचा समावेश असलेला स्वतंत्र ध्वज निर्माण करण्यात आला आहे.
 • यामध्ये महाराजांचा जिरेटोप, सुवर्ण होन, जगदंब तलवार, शिवमुद्रा आणि वाघनखे यांचा समावेश आहे.

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLI)

 • देशातील औद्योगिक उत्पादनाला चालना देण्यासाठी २०२० मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली.
 • १३ औद्योगिक क्षेत्रांसाठी लागू असलेल्या या योजनेची व्याप्ती वाढवायचे ठरवले आहे.
 • आता ही योजना वाहनांचे सुटे भाग बनवणे, पोलाद व वस्त्रोद्योग या उद्योगांनाही लागू होणार आहे.

टाइम्स हायर एज्युकेशन अशिया क्रमवारी

 • टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ नुकतीच जाहीर करण्यात आली.
 • या क्रमवारीमध्ये चीनमधील सिंगुआ विद्यापीठाने पहिले उत्तर पेकिंग विद्यापीठाने दुसरे स्थान मिळवले आहे.
 • पहिल्या शंभर संस्थांमध्ये चीनमधील शिक्षण संस्थांची संख्या जास्त आहे. तर भारतातील केवळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (३७), आयआयटी रोपर (५५) आणि आयआयटी इंदूर (७८) या तीन संस्थांना स्थान मिळाले आहे.
 • पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतातील १८ शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
 • महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (१२२), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१६९), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे) (१९९) या तीन उच्च शिक्षण संस्थांनी आशियातील पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.

कविशा श्रॉफला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान

 • एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनियरिंग सायन्सेस अँड रिसर्च मधील कविता श्रॉफ या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केला आहे.
 • आशियाई युवा मॉडेल युनायटेड नेशन परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रतिनिधीचा पुरस्कार तिने पटकावला.
 • जागतिक आरोग्य संघटनेतर्फे २८ ते ३१ मे दरम्यान एशियन युथ इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
 • सुमारे ५८ देशांतील प्रतिनिधींनी त्यात भाग घेतला होता. कविशाने रवांडा या देशाचे प्रतिनिधित्व करून वायू प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी करण्याबाबतच्या चर्चेत प्रथम क्रमांक पटकावला.

टेम्पलटन पुरस्कार २०२१

 • वानरवैज्ञानिक जेन गुडाल यांना या वर्षीचा प्रतिष्ठेचा टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • चिंपांझीच्या संवर्धनासाठी त्यांनी मोठे काम केले आहे.
 • टेम्पलटन पुरस्कार विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जातो.
 • मागील वर्षी हा पुरस्कार अमेरिकेतील ह्यूमन जीनोम प्रोजेक्टचे डॉ. फ्रान्सिस कॉलिंस यांना मिळाला होता.
 • जेन गुडाल यांनी १९७७ मध्ये जेन गुडाल इन्स्टिट्यूट ही संस्था चिंपाझीच्या संरक्षण व अभ्यासासाठी स्थापन केली.

मागासवर्गीय आयोगावर सदस्यांची नियुक्ती

 • राज्य सरकारने ३ जून २०२१ रोजी ९ मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
 • नवीन सदस्य – बबनराव तायवाडे, चंद्रलाल मेश्राम, बालाजी किल्लारिकर, संजीव सोनवणे, गजानन खराटे, नीलिमा सराफ, गोविंद काळे, लक्ष्मण हाके, अलका राठोड
 • जानेवारी २०२० मध्ये आयोगाची मुदत संपुष्टात आल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. आनंद निरगुडे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती.

रंजितसिंह डिसले जागतिक बँकेचे सल्लागार

 • ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रंजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • त्यांची जून २०२१ ते जून २०२४ अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *