कुतूहल : आनुवंशिकतेचे मूळ

सन १८६८-६९ मध्ये स्वीस संशोधक फ्रिडरिश मिशेर याचे रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींवर संशोधन चालू होते. शस्त्रक्रियेनंतर बांधलेल्या बँडेजमधील पुवात पांढऱ्या पेशी मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याने, संशोधनासाठी मिशेर या द्रवाचा वापर करत होता. विविध रासायनिक प्रक्रिया वापरून या द्रवातले पदार्थ एकेक करून त्याने वेगळे केले. या प्रक्रियांतून अखेर प्रथिन नसलेला, मोठय़ा प्रमाणात फॉस्फोरस असलेला एक पदार्थ वेगळा झाला. सर्व पेशींच्या केंद्रकांचा अविभाज्य घटक असणाऱ्या या आम्लधर्मी पदार्थाला त्याने ‘न्यूक्लाइन’ हे नाव दिले. कालांतराने हा पदार्थ न्यूक्लिइक आम्ल या नावे ओळखला जाऊ लागला.

इंग्लंडचा फ्रेडरिक ग्रिफिथ हा १९२८ साली न्यूमोनियावरील लसीवरच्या संशोधनात स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिए या जिवाणूंचे दोन प्रकार अभ्यासत होता. यातील फक्त पहिल्या प्रकारामुळे उंदरांना न्यूमोनियाची लागण होत होती, तर दुसरा प्रकार मात्र लागणमुक्त होता. ग्रिफिथने यातील पहिल्या प्रकारच्या जिवाणूंचा तापमान वाढवून मृत्यू घडवून आणला. यानंतर त्याने हे दोन्ही प्रकारचे जिवाणू एकत्र करून उंदरांना टोचले. आश्चर्य म्हणजे आता मात्र काही उंदरांचा न्यूमोनियाने मृत्यू घडून आला. ग्रिफिथने जेव्हा मृत उंदराच्या शरीराचे विश्लेषण केले, तेव्हा त्याला उंदराच्या शरीरात न्यूमोनियाची लागण करू शकणाऱ्या प्रकारचे जिवंत जिवाणू आढळले. याचा अर्थ, न्यूमोनियाची लागण घडवून आणणाऱ्या मृत जिवाणूंतील एखाद्या जनुकीय घटकाच्या गुणधर्माचे, न्यूमोनियाची लागण न घडवणाऱ्या जिवंत जिवाणूंत स्थानांतर झाले होते!

कॅनडिअन-अमेरिकन संशोधक ओस्टवाल्ड अ‍ॅव्हरी याने १९४४ साली केलेल्या संशोधनात, या मृत जिवाणूंतील एकेक रासायनिक घटक वेगळा करत, गुणधर्माच्या स्थानांतरणाला कारणीभूत असणारा घटक शोधून काढला. सजीवाच्या गुणधर्माचे वाहक असणारे हे रेणू आज ‘डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल’ अर्थात डीएनए या नावे ओळखले जातात. एकोणिसाव्या शतकात फ्रिडरिश मिशेरने पेशींपासून वेगळा केलेला न्यूक्लाइन हा पदार्थ डीएनएच होता. दरम्यान १९२९ साली न्यूक्लिइक आम्ले ही अ‍ॅडेनिन, सायटोझिन, ग्वानिन आणि थायमिन या मूलभूत घटकांच्या वेगवेगळ्या रचनांद्वारे निर्माण होत असल्याचे अमेरिकेच्या फोबस लेव्हेने याने रासायनिक विश्लेषणाद्वारे दाखवून दिले होते. डीएनएच्या रेणूंची दुपेडी स्वरूपातली वैशिष्टय़पूर्ण रचना अमेरिकेच्या जेम्स वॉटसन आणि ब्रिटनच्या फ्रान्सिस क्रिक यांनी स्फटिकशास्त्राद्वारे १९५०च्या दशकात शोधून काढली.

– डॉ. राजीव चिटणीस

Source : Loksatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *